Mumbai Pune Bullet Train | मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये या दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून, त्यामुळे सध्या सुमारे चार तास लागणारा रेल्वे प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
हाय-स्पीड रेल्वेमुळे वेळेची बचत :
अर्थमंत्री यांनी जाहीर केलेल्या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर्समध्ये मुंबई-पुणे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या कॉरिडोरवर 300 ते 320 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. सध्या रेल्वेमार्गे मुंबई-पुणे प्रवासासाठी साधारण चार तासांचा कालावधी लागतो, मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो थेट 48 मिनिटांवर येणार आहे. (Mumbai Pune Bullet Train)
या अतिवेगवान रेल्वे सेवेमुळे दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. अनेक जण नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी रोज या दोन शहरांमध्ये ये-जा करतात. नव्या व्यवस्थेमुळे बोरीवली (Borivali) ते चर्चगेट (Churchgate) एवढ्या वेळेत मुंबईहून थेट पुण्यात पोहोचणे शक्य होणार असून, प्रवासातील वेळ आणि थकवा दोन्ही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.
Mumbai Pune Bullet Train | आर्थिक विकासाला चालना, वाहतूक कोंडी कमी :
मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल कॉरिडोर सुरू झाल्यानंतर केवळ प्रवास जलद होणार नाही, तर आर्थिक, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रालाही मोठा फायदा मिळणार आहे. प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद (Hyderabad) बुलेट ट्रेन कॉरिडोरमुळे आयटी, उद्योग, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला थेट चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तीन शहरांमधील वेगवान आणि विश्वासार्ह कनेक्टिविटीमुळे गुंतवणूक वाढेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. (Mumbai Pune Bullet Train News)
सध्या मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मध्य रेल्वे (Central Railway) कडून दररोज पहाटे पाच विशेष गाड्या चालवल्या जातात, ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चाही समावेश आहे, तरीदेखील तिकिटे कन्फर्म होणे अनेकदा अवघड ठरते.
याशिवाय बहुतांश प्रवासी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वापरतात, जिथे खासगी वाहने, बस आणि शेअरिंग कॅब्सची मोठी गर्दी असते. उपलब्ध माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर दररोज सरासरी 43 हजार वाहनांची ये-जा होते. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर रस्ते आणि हवाई वाहतुकीवरील हा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.






