Mumbai Municipal Election 2026 | आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा संघर्ष चिघळताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. भाजपकडून शिवसेनेला 90 जागांचा प्रस्ताव देण्यात आला असला, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 125 जागांवर ठाम असल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे. (Eknath Shinde Shiv Sena)
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवणे आणि आगामी काळात महापौरपदावर दावा मजबूत करणे, हा शिंदे गटाचा मुख्य उद्देश असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 125 जागांपेक्षा कमी जागांवर तयार नसल्याचा स्पष्ट संदेश बैठकीत देण्यात आला आहे. या भूमिकेमुळे महायुतीतील चर्चा निर्णायक वळणावर पोहोचली आहे.
महापौरपदावर नजर; 125 जागांचा आग्रह कशासाठी? :
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेला मजबूत संख्याबळ हवे आहे. शिवसेनेच्या मते, किमान 125 जागांवर निवडणूक लढवली तरच पक्षाला महापौरपदावर ठोस दावा करता येईल. शिवसेनेचा दावा आहे की, मुंबईतील किमान 60 जागांवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व असून उर्वरित प्रभागांमध्येही पक्षाची ताकद वाढली आहे.
दुसरीकडे, भाजपने दिलेल्या 90 जागांच्या प्रस्तावात तब्बल 30 जागा मुस्लिमबहुल प्रभागांतील असल्याची चर्चा आहे. हा प्रस्ताव शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी दिला असल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी 125 जागांच्या मागणीवर तसूभरही मागे न हटण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
Mumbai Municipal Election 2026 | नंदनवनमध्ये कोअर कमिटी बैठक; भाजपला थेट संदेश :
वर्षा निवासस्थानी सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shiv Sena) यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेची तातडीची कोअर कमिटी बैठक पार पडली. या बैठकीत 125 जागांच्या मागणीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आला असून भाजपला स्पष्ट आणि ठाम संदेश देण्यात आला आहे. (Mumbai Municipal Election 2026)
याचवेळी शिवसेनेने मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन सुरू केल्याचं चित्र आहे. राज्यभरातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून आज सायंकाळी वीर सावरकर स्मारकात त्यांचा सत्कार होणार आहे. या शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून शिवसेना आपली संघटनात्मक ताकद भाजपसमोर मांडण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.






