Mayank Pawar Death | मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. MTV Splitsvilla फेम अभिनेता मयंक पवार यांचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘स्प्लिट्सव्हिला 7’ मधून मिळाली ओळख :
मयंक पवार यांनी MTV Splitsvilla च्या सातव्या पर्वात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या शोमध्ये ते वादग्रस्त ठरले होते, मात्र त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडत मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि ठाम भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.
मयंक यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात त्यांना “भाऊ, चॅम्पियन, मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणा” असे संबोधण्यात आले आहे.
25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान राणा प्रताप बाग येथील संगम पार्कमधील वाल्मिकी मंदिर येथे शोकसभा आयोजित करण्यात आल्याची माहिती पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
Mayank Pawar Death | सनी लिओनी झाली होती भावुक :
‘स्प्लिट्सव्हिला 7’ दरम्यान एक प्रसंग विशेष गाजला होता. शोची होस्ट असलेल्या Sunny Leone मयंकसाठी भावुक झाल्या होत्या. एका टास्कदरम्यान त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तो व्हिडिओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






