राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले! पिकांचे मोठे नुकसान

On: February 24, 2026 4:05 PM
Maharashtra Hailstorm
---Advertisement---

Maharashtra Hailstorm | मागील दोन दिवसांत राज्यातील हवामानात झालेल्या अचानक बदलांमुळे अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसला आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पुढील 24 तासांतही परिस्थिती कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भात पिकांचे मोठे नुकसान :

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी सरींनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. तुळजापूर आणि कळंब परिसरातील द्राक्ष उत्पादकांवर या पावसाचा गंभीर परिणाम झाला असून द्राक्षबागांवर रोगराई आणि गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार द्राक्ष उत्पादनात तब्बल 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते, ज्यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील वाघोली शिवारात गारांसह कोसळलेल्या वादळी पावसाने टरबूज पिक पूर्णपणे जमिनीवर आडवे झाले. उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारात चांगली मागणी असलेल्या टरबूजाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. हिंगणघाट, देवळी आणि समुद्रपूर तालुक्यात गहू, हरभरा तसेच विविध भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू पिके आडवी पडल्याने उत्पादनावर परिणाम होणार असून, अनेक ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी अद्याप पंचनाम्यासाठी पोहोचले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

Maharashtra Hailstorm | परभणी-बीड-यवतमाळमध्ये रब्बी हंगाम धोक्यात :

परभणी (Parbhani) जिल्ह्यात रिमझिम पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही मिनिटांच्या सरींनी उभ्या पिकांवर विपरीत परिणाम केला असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील पाली शिवारात ज्वारी, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फुलशेतीला फटका बसला. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता रब्बी पिके कापणीच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नागपूर (Nagpur), भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यांनाही या पावसाचा तडाखा बसला असून भिवापूर, हिंगणा आणि बुटीबोरी भागात हलक्या सरींनी आंब्याचा मोहोर, हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची आणि तूर पिकांचे नुकसान केले आहे.

News Title: Maharashtra Hailstorm Damages Major Crops

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now