MSRTC Recruitment | राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती जाहीर करण्यात आली असून, चालक आणि सहायक पदांसाठी हजारो जागा भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (ST driver jobs)
मेगाभरतीचा निर्णय आणि नवीन बसेस :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) मध्ये तब्बल 17 हजार 450 चालक व सहायक पदांसाठी कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती जाहीर केली. मुंबई (Mumbai) येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या मोठ्या भरतीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे एसटीच्या दैनंदिन कामकाजात गती येईल आणि सेवा सुरळीत पार पाडता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महामंडळाकडून आगामी काळात 8 हजार नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्याची योजना आखण्यात आली आहे. या बसेस रस्त्यावर उतरवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे असल्याने ही भरती अपरिहार्य ठरली आहे. सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याने अनेक बससेवा प्रभावित होत आहेत. “जर पुरेसे कर्मचारी नसतील तर बसेस उभ्या राहण्याची वेळ येईल, म्हणूनच भरती प्रक्रिया हाती घेतली आहे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
MSRTC Recruitment | भरती प्रक्रिया, वेतन आणि प्रवासी लाभ :
भरतीसाठी 2 ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आणि पारदर्शकतेने पार पडेल. राज्यातील 6 प्रादेशिक विभागांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येतील. निविदा अंतिम झाल्यानंतर निवडलेल्या कंत्राटदार कंपन्यांमार्फत चालक आणि सहायक उपलब्ध करून दिले जातील. नियुक्त कर्मचारी तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर कार्यरत राहतील. (MSRTC Recruitment)
निवड झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 30 हजार रुपयांचे मासिक वेतन देण्यात येईल. हे वेतन शासनाच्या नियमांनुसार असेल आणि त्यात नियमानुसार वाढही केली जाईल. याशिवाय महामंडळाकडून चालकांना वाहनचालक प्रशिक्षण, सुरक्षितता नियम आणि प्रवाशांशी वर्तन या बाबींवर सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीमुळे एसटी बसेस वेळेवर धावतील, सेवा अधिक नियमित होईल आणि प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळेल. मनुष्यबळ वाढल्याने गर्दी कमी होऊन सेवा दर्जेदार होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.






