MS Dhoni | चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत धोनी खेळणार की निवृत्ती घेणार, या प्रश्नावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर सीएसकेच्या सीईओंनी याबाबत अधिकृत वक्तव्य देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या 2025 च्या (CSK) सुमार कामगिरीनंतर, चाहत्यांमध्ये प्रश्न होता की ‘थलायवा’ पुन्हा दिसणार का? पण सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले, “एमएस धोनीने आम्हाला स्पष्ट सांगितले आहे की तो पुढील हंगामासाठी उपलब्ध असेल.” म्हणजेच धोनी आयपीएल 2026 स्पर्धेत निश्चितपणे खेळणार आहे.
धोनीचा विक्रमी प्रवास :
2008 मध्ये आयपीएलची (IPL) सुरुवात झाल्यापासून महेंद्रसिंह धोनी सीएसकेचा अविभाज्य भाग राहिला आहे. आतापर्यंत त्याने फ्रँचायझीसाठी 248 सामने खेळले असून 4865 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 या पाच हंगामांमध्ये जेतेपद पटकावलं आहे.
सुपर किंग्सचा संघ दोन वर्षांसाठी निलंबित झाल्याचा काळ वगळता, धोनी प्रत्येक हंगामात पिवळ्या जर्सीत झळकला आहे. त्यामुळे आयपीएल 2026 हा त्याच्या कारकिर्दीतील 19वा आणि सीएसकेसाठीचा 17वा हंगाम असेल.
MS Dhoni | चाहत्यांमध्ये जल्लोष :
धोनी पुन्हा खेळणार या घोषणेनंतर सीएसकेच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेन्नईच्या मैदानावर पुन्हा एकदा “धोनी! धोनी!” अशी घोषणा घुमणार यात शंका नाही. (MS Dhoni)
धोनीने आयपीएलमधून कधी निवृत्ती घ्यायची हा निर्णय तो स्वतः घेतो आणि तोपर्यंत प्रत्येक सामना त्याच्यासाठी शेवटचा नसून नवा अध्याय ठरतो.






