MPSC l राज्यातील MPSC परीक्षार्थींसाठी मोठी भरती आणि महत्त्वाचे बदल होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. MPSC परीक्षेला UPSCप्रमाणे वार्षिक कॅलेंडर मिळणार असून, परीक्षेची प्रक्रिया डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात होणार आहे. काही घटकांचा याला विरोध असला तरी राज्य सरकार हा विरोध मान्य करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
MPSC परीक्षेतील मोठे बदल :
MPSCच्या प्रक्रियेबाबत सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये असलेला रोष लक्षात घेऊन सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत –
– UPSCप्रमाणे MPSC परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर तयार होणार.
– MPSC परीक्षा डिस्क्रीप्टिव्ह स्वरूपात होणार.
– रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचा वेग वाढवला जाणार.
– मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, MPSC स्वायत्त संस्था असली तरी सरकार परीक्षार्थींच्या हिताचा विचार करून आवश्यक सुधारणा करणार आहे.
MPSC l रिक्त पदांची भरती आणि नियुक्ती प्रक्रिया वेगवान होणार :
MPSC परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, परीक्षा पार पडल्यानंतर निकाल आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठा विलंब होतो. यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. MPSC मंडळात सध्या तीन पदे रिक्त आहेत, ती तात्काळ भरली जाणार असून, भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
तांत्रिक पदांसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, अभियांत्रिकी आणि कृषी विषयांच्या परीक्षा आता मराठीतून होणार आहेत. तसेच, या विषयांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
MPSC परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर :
विधानसभेत आमदार विक्रम काळे यांनी MPSCच्या निवड प्रक्रियेत मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियुक्ती होत नाही, तसेच काही व्यवहार होत असल्याचे आरोप केले. यावर मुख्यमंत्र्यांनी MPSCची प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाईल आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, MPSCच्या सर्व पदांची भरती लवकरात लवकर करण्यात येईल. भविष्यात मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांसाठी भरती होईल, त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असेल.






