MPSC Student Death | पुणे शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या ताणतणावामुळे आणि मानसिक दबावामुळे विद्यार्थी नैराश्यात जात असल्याच्या घटना वाढत असताना, आणखी एका 26 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज सकाळी उघड झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (MPSC Student Death)
सागर पवार (Sagar Pawar) असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा बुलढाणा (Buldhana student) जिल्ह्यातील रहिवासी आहे. पुण्यात राहून तो MPSC परीक्षेची तयारी करत होता. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह खोलीत आढळून आला. प्राथमिक माहितीप्रमाणे, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने राहात असलेली खोली आतून लॉक होती, त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
खोलीत सापडला मृतदेह; सुसाइड नोट अद्याप सापडलेली नाही :
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असता, खोली आतून बंद असल्याचे दिसून आले. सकाळी मित्र आणि शेजारी विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मालकाला कळवले. दरवाजा उघडून पाहिल्यावर सागर पवार याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला तात्काळ खाली उतरवण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला असून, अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, परीक्षेच्या ताणामुळे झालेल्या नैराश्यामुळे हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
MPSC Student Death | कुटुंबियांकडून अधिक माहितीची अपेक्षा; पोलिसांचा तपास सुरु :
सागर पवारचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना तात्काळ संपर्क साधण्यात आला आहे. कुटुंबीय पुण्यात येत असून त्यांच्या जबाबांनंतर या प्रकरणाबद्दल अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सांगितले की, सागर पवार याच्या मोबाईल फोन, वह्या आणि इतर साहित्याची तपासणी सुरू आहे. काही वैयक्तिक समस्या होती की केवळ परीक्षेचा ताण होता, याबाबत तपास सुरू आहे.
MPSC सारख्या कठोर आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी पुण्यात येतात. अभ्यासाचा ताण, आर्थिक अडचणी, अपयशाची भीती, आणि सामाजिक अपेक्षा यामुळे अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गंभीर दुर्लक्ष? :
अशी घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थी मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. हजारो विद्यार्थी एकाच उद्दिष्टासाठी झगडत आहेत, पण त्यामागील भावनिक तणावाकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षे परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक मदत मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, भावनिक मदत आणि दबाव हाताळण्यासाठी मार्गदर्शनाची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, कुटुंबियांकडून अधिक माहिती समजल्यावर या प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.






