राज्य सरकारने घेतले ३ मोठे निर्णय, आता वाहतूक व्यवस्था सुलभ होणार

On: January 27, 2026 6:02 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra | राज्य सरकारने आज (27 जानेवारी) पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याचा थेट फायदा मुंबई महानगर क्षेत्रासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो लाईन 8 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून समृद्धी महामार्गाच्या विस्तारासह नाशिक शहर परिक्रमा मार्गालाही गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. या निर्णयांमुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होणार असून आर्थिक विकासाला नवी चालना मिळण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnavis Decisions)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो लाईन 8 प्रकल्पाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प एकूण 35 किलोमीटरचा असून पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भूसंपादन आणि इतर परवानग्या सहा महिन्यांत पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मेट्रो लाईन 8: 35 किमी मार्ग, 20 स्थानके :

मेट्रो लाईन (Metro Line 8 Mumbai) 8 मार्गावर एकूण 20 स्थानके असणार असून यापैकी 6 स्थानके भूमिगत तर 14 स्थानके उन्नत असतील. भूमिगत मार्गाची लांबी 9.25 किलोमीटर तर उन्नत मार्गाची लांबी 24.636 किलोमीटर असेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 ते घाटकोपर पूर्वपर्यंत भूमिगत स्थानके असतील, तर घाटकोपर पश्चिम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 पर्यंत उन्नत स्थानके असतील. दोन स्थानकांतील सरासरी अंतर सुमारे 1.9 किलोमीटर असणार आहे.

या प्रकल्पासाठी 30.7 हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यासाठी सुमारे 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्प खर्च सुमारे 22,862 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवास जलद आणि सुलभ होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra | समृद्धी महामार्ग विस्तार आणि नाशिक परिक्रमा मार्गाला गती :

समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg Extension) विस्तार गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत करण्यात येणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विदर्भातील खनिज वाहतूक, औद्योगिक विकास आणि दळणवळण सुधारण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत आणि कोणताही विलंब होऊ नये यासाठी सर्व परवानग्या आधीच घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Metro Line 8 Mumbai)

त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर असून सुमारे 3,954 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव मोरे ते सुरजागड महामार्गाच्या 85.76 किलोमीटर लांबीच्या सुधारित मार्गालाही मान्यता देण्यात आली आहे. या तीन मोठ्या निर्णयांमुळे राज्यातील वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Metro Line 8 Approved, Samruddhi Highway Extension Gets Green Signal

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now