Mayor Election | राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. अनेक महापालिकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या आणि अनपेक्षित युतींची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून, भाजप, शिवसेना (ठाकरे गट), शिंदे गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या समीकरणांची चर्चा सुरू आहे.
काही ठिकाणी परंपरागत विरोधी पक्षही एकत्र येण्याची चिन्हे दिसत असून, सत्तेसाठी कोण कोणासोबत जाणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क सुरू आहेत. यामुळे महापौरपदाची लढत अधिकच रंजक बनली असून, आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mayor Election Maharashtra)
भाजप-उद्धव ठाकरे जवळ येणार? :
चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Mahapalika) भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून “जो आमचा महापौर करेल त्याच्यासोबत जाण्यास आम्ही तयार आहोत,” असे संकेत देण्यात आले असून, यामुळे काँग्रेसवर दबाव वाढला आहे. भाजपने ठाकरे गटाला महापौरपद देऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय तपासण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. असे झाल्यास काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली सत्ता घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य जवळीक ही सध्याच्या राजकीय स्थितीतील सर्वात मोठी चर्चा ठरत आहे. (Congress Shinde alliance)
Mayor Election | काँग्रेस-शिंदे गटाची जुळवाजुळव?
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेत युती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे 34 तर शिंदे गटाकडे 15 नगरसेवक असल्याने दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणे शक्य आहे. यासाठी दोन्ही बाजूंमध्ये बैठकांना वेग आला असून, पडद्यामागे महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
याशिवाय उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला अधिकृत पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे येथे शिंदे गटाचा महापौर होण्याची शक्यता बळावली असून, उपमहापौरपद वंचितला मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मालेगाव आणि KDMC मध्ये वेगळीच खेळी :
मालेगावमध्ये एमआयएम आणि इस्लाम पार्टी यांच्यात युती होण्याची शक्यता असून, जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी ही आघाडी तयार केली जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. एमआयएमने सेना-भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इस्लाम पार्टीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.
तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही महापौरपदावरून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र सत्ता समीकरणांची चाचपणी करत असून, ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून समर्थन मिळवण्यासाठी गुप्त प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथेही महापौरपदाची लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.






