Maruti Suzuki | भारतात हायब्रीड वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असताना मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नव्या रणनीतीसह बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसोबतच कंपनी आता स्वतः विकसित केलेल्या हायब्रीड तंत्रज्ञानावर भर देत असून, 2026 पर्यंत दोन नवीन हायब्रीड SUV सादर करण्याची योजना आखत आहे. या नव्या मॉडेल्समुळे ग्राहकांना अधिक मायलेज, कमी इंधन खर्च आणि पर्यावरणपूरक ड्रायव्हिंगचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.
‘HEV’ तंत्रज्ञानावर कंपनीची मोठी बाजी :
सध्या ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि इनव्हिक्टो (Invicto) या मॉडेल्सच्या जोरावर मारुती सुझुकीने देशातील हायब्रीड वाहन विभागात सुमारे 19 टक्के बाजारपेठ मिळवली आहे. आता हा हिस्सा आणखी वाढवण्यासाठी कंपनी स्वतःच्या हायब्रीड पॉवरट्रेनच्या विकासावर काम करत आहे. ‘HEV’ या कोडनेमने ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान सध्याच्या काही हायब्रीड सिस्टीमपेक्षा अधिक इंधन कार्यक्षम ठरू शकते, अशी उद्योग क्षेत्रात चर्चा आहे.
या नव्या हायब्रीड सिस्टीमचा उत्पादन खर्च तुलनेने कमी राहणार असल्याने वाहनांच्या किंमतीही स्पर्धात्मक ठेवता येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या लोकप्रिय फ्रॉन्क्स फेसलिफ्ट (Fronx Facelift) मॉडेलमध्ये हे तंत्रज्ञान प्रथमच पाहायला मिळू शकते. त्यामुळे फ्रॉन्क्सला अधिक मायलेज देणारी आणि आधुनिक फीचर्सने सुसज्ज SUV म्हणून नवीन ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Maruti Suzuki | 2026 मध्ये दोन नवीन SUVची एंट्री :
मारुती सुझुकी 2026 मध्ये अद्ययावत ग्रँड विटारा फेसलिफ्ट आणि नवीन प्रीमियम 7-सीटर SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ‘Y17’ या कोडनेमने विकसित होत असलेली ही SUV ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. मोठ्या कुटुंबांची गरज लक्षात घेऊन या मॉडेलमध्ये तीन रांगांची आसनव्यवस्था दिली जाणार असून, अतिरिक्त जागेसाठी तिचा व्हीलबेस सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक लांब असण्याची शक्यता आहे.
ही 7-सीटर SUV ग्लोबल सी-प्लॅटफॉर्म (Global C-Platform) वर विकसित केली जाणार असून, त्यामध्ये 104 BHP क्षमतेचे 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि 116 BHP क्षमतेचे 1.5 लिटर स्ट्राँग हायब्रीड पेट्रोल इंजिन असे दोन पर्याय मिळू शकतात. याशिवाय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध असतील. काही व्हेरियंटमध्ये AWD (All-Wheel Drive) तंत्रज्ञान देण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, ग्रँड विटारा फेसलिफ्टमध्ये नवीन फ्रंट ग्रील, अपडेटेड बंपर, सुधारित LED हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्स, नवीन अलॉय व्हील्स, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assistance Systems) सेफ्टी फीचर्स दिले जाऊ शकतात. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी हायब्रीड सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे.






