मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा! ‘या’ नेत्यांची अजित पवारांकडे मागणी

On: September 16, 2025 10:40 AM
Marathwada Rain Havoc
---Advertisement---

Marathwada Rain Havoc | मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी आणि इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, शेतजमिनींचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठवाड्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले असून, या संदर्भात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदारांची भूमिका आणि शेतकऱ्यांची स्थिती :

भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले. रत्नाकर गुट्टे म्हणाले, “गेल्या ५० वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नाही. धान्य वाहून गेले आहे. मतदारसंघात मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणे आवश्यक आहे.” (Marathwada Rain Update)

तर आमदार राजू नवघरे यांनी सांगितले की, ऊस, केळी यांसारखी पिकं तसेच जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी. ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनीही “सोयाबीन, कापूस यांसारखी पिकं वाहून गेली असून महायुती सरकारने वचनाप्रमाणे त्वरित मदत जाहीर करावी” अशी मागणी केली.

Marathwada Rain Havoc | अतिवृष्टीची भीषण परिस्थिती :

गेल्या २४ तासांतच ३२ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील १५, लातूरमध्ये ४, धाराशिवमध्ये ७, परभणीमध्ये ४ आणि हिंगोलीतील २ मंडळांत मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलूती लोअर दुधना प्रकल्पाचे २० पैकी १४ दरवाजे उघडावे लागले, तर येलदरी प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. परिणामी पूर्णा, दुधना आणि गोदावरी या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. (Marathwada Rain Update)

हिंगोलीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, हळद, ऊस यांसारखी पिकं अक्षरशः वाहून गेली आहेत. सुपीक जमीनसुद्धा पावसाने वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कर्ज काढून घेतलेली शेती अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाल्याने पुढील वर्षाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.

निर्णयाची शक्यता :

सरकारकडे नुकसानीचे पंचनामे करण्याची आणि तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश आणि आमदारांची एकमुखी मागणी पाहता, आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

News Title: Marathwada Rain Havoc: MLAs Demand ‘Wet Drought’ Declaration, Ajit Pawar Promises Relief – Cabinet Meeting Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now