Malad Murder | मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्राध्यापकाचा मालाड रेल्वे स्थानकावर अत्यंत धक्कादायक पद्धतीने खून झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेला प्रकार काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात बदलला आणि 33 वर्षीय आलोक कुमार सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Malad Railway Station Crime)
किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला :
मिळालेल्या माहितीनुसार, आलोक सिंह हे एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि शनिवारी संध्याकाळी लोकलने घरी परतत होते. प्रवासादरम्यान सहप्रवाशाशी किरकोळ वाद झाला होता. ट्रेन मालाड स्टेशनवर थांबताच उतरतानाच हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटात वार केला आणि चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. काही क्षणांतच संपूर्ण प्लॅटफॉर्मवर खळबळ उडाली.
पोलिस तपासात समोर आले आहे की, आरोपी ओमकार शिंदे हा रोज याच लोकलने प्रवास करत होता. गर्दीत पुढे जाण्यासाठी तो आलोक सिंह यांना ढकलत होता, मात्र समोर महिला उभी असल्याने त्यांनी धक्का देऊ नये अशी सूचना केली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि उतरतानाच आरोपीने खिशात असलेल्या टोकदार चिमट्याने आलोक सिंह यांच्या पोटात एकच वार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्येही हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
Malad Murder | आरोपी अटकेत, पोलिस तपास सुरू :
जखमी अवस्थेत आलोक सिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बोरीवली जीआरपीने आरोपीविरुद्ध भादंवि कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Local Train Attack)
या घटनेने मुंबईतील रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






