Mahayuti Seat Sharing | राज्यातील महापालिका निवडणुकीचे वारे जोर धरू लागले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीचा प्राथमिक जागावाटप फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र आले असले तरी सर्व शहरांमध्ये युतीचा पॅटर्न एकसारखा नसणार आहे. मोठ्या महापालिकांमध्ये संयुक्त लढाई तर काही ठिकाणी स्वतंत्र रणनीती आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक (Nashik) आणि नागपूर या महत्वाच्या महानगरांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, नेतृत्वाचे समीकरण आणि मागील निवडणुकांतील अनुभव लक्षात घेऊन एकत्र लढण्याचा निर्णय महायुतीकडून घेतला जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये हा फॉर्म्युला वेगळा असणार आहे.
पुणे व पिंपरीत वेगळी चूल, स्वतंत्र लढण्यामागील कारणे :
पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये (Pimpri chinchwad mahapalika) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही शहरांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद जवळजवळ समान असल्याने जागावाटपाच्या वेळी बंडाची शक्यता वाढते. कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, नाराजी टाळावी आणि अंतर्गत संघर्ष रोखावा यासाठी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वतंत्र लढाईच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आपापले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय महायुतीसमोर खुला राहील. हा पॅटर्न विरोधकांना रोखण्यासाठी तसेच सत्ता समीकरण आपल्या बाजूने करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Mahayuti Seat Sharing | नागपूरमध्ये संयुक्त लढाई, नवी मुंबईचा निर्णय प्रलंबित :
नागपूरमध्ये भाजपची ताकद जास्त असूनही शिवसेना (शिंदे गट) सोबत एकत्र लढण्याचा विचार सुरु असल्याचे सूचनांमधून दिसते. स्थानिक नेतृत्वाचा तोल राखणे आणि सत्ता संरचनेत मित्रपक्षांना स्थान मिळावे यासाठी संयुक्त लढाईचा फॉर्म्युला येथेही लागू होऊ शकतो. नवी मुंबई महापालिकेविषयी (Mumbai mahapalika) मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. भाजप-शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्याने मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले होते. या अनुभवामुळे महापालिका निवडणुकीसाठी अधिक सावधपणे फॉर्म्युला आखण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तीनही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर हालचाली वाढल्या असून, उमेदवार निवड आणि जागावाटप यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.






