Weather Update | राज्यासह देशभरात सध्या हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पावसाची परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांना हवामानाच्या चढउतारांचा सामना करावा लागत आहे. या बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून सर्दी, ताप, श्वसनाचे आजार वाढताना दिसत आहेत. वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली असून अनेक शहरांमध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत. (IMD Weather Update)
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात घसरले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार आहे. मात्र, त्या तुलनेत महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रभाव कमी असल्याने गारठा तुलनेने कमी जाणवत आहे.
राज्यात थंडी कायम, तापमानात चढउतार :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले असून थंडीचा प्रभाव वाढला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र थंडी कायम राहणार आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी तापमान थेट ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. अमृतसरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद १.३ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. तर महाराष्ट्रात धुळे येथे ६ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदवले गेले असून परभणीमध्ये ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Weather Update | पुढील 72 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा :
जळगाव, मालेगाव, नाशिक, गोंदिया, भंडारा आणि नागपूर येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे. हवामानात चढउतार होत असले तरी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीची आणखी एक लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Rain Alert January)
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ७२ तासांत बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. याचा परिणाम म्हणून तामिळनाडूसह दक्षिण भारतातील सुमारे पाच राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






