TET Result | राज्यातील शिक्षक पदोन्नतीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) निकाल जाहीर (TET Result) झाल्यानंतर शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने पदोन्नती प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच प्रत्यक्ष पदोन्नती आदेश निघण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात केंद्र प्रमुख, नंतर मुख्याध्यापक :
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. या अटीमुळे राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नती प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर शासनाने सर्व अटींचे पालन करत पदोन्नतीस परवानगी दिल्याने अडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात केंद्र प्रमुख पदाची पदोन्नती करण्यात येणार असून, संच मान्यता मिळाल्यानंतर उपाध्यापक आणि मुख्याध्यापक पदोन्नतीसाठीही मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हास्तरावर अंदाजे ६० पेक्षा अधिक केंद्र प्रमुख, सुमारे ५० विस्तार अधिकारी आणि जवळपास १०० मुख्याध्यापकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी अंतिम संच मान्यता आवश्यक असल्याने ही प्रक्रिया थोड्या विलंबाने पूर्ण होणार आहे. (TET Result News)
TET Result | TET न उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नती नाही :
शासनाच्या नव्या पत्रानुसार न्यायालयीन निर्णयानंतर दोन वर्षांची सवलत लागू केली जाणार नाही. म्हणजेच TET परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना कोणत्याही पदावर पदोन्नती मिळणार नाही. अवर सचिव शरद माकणे यांनी स्पष्ट केले आहे की, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी किंवा मुख्याध्यापक पदासाठी TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांची रखडलेली पदोन्नती आता स्पष्ट निकषांवर पूर्ण होणार आहे.
शिक्षक संघटनांनी पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध आणि कोणावरही अन्याय न होईल अशा पद्धतीने राबवावी, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे शिक्षक वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षण व्यवस्थेत स्थैर्य आणि शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






