Maharashtra Expressway | महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातून जाणाऱ्या आणखी एका राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्यात आले असून, नव्या महामार्गांची उभारणीही वेगाने सुरू आहे. अशातच आता उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एक मार्ग चौपदरी होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (Nashik Saputara four lane road)
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी ते गुजरातमधील सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील प्रसिद्ध हिल स्टेशन सापुताराला जाणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.
वणी ते हातगड पहिला टप्पा, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण :
या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली असून त्यामुळे प्रत्यक्ष कामाला आता वेग येणार आहे. चौपदरीकरणाचा पहिला टप्पा वणी ते हातगड असा असणार असून, या टप्प्यात सुमारे १७ किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते सापुतारा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
सध्या हा मार्ग दुहेरी असून घाटाचा भाग असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासासाठी जास्त वेळ लागत आहे. चौपदरी रस्त्यामुळे या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग अधिक सक्षम ठरणार आहे.
Maharashtra Expressway | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय :
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते वणी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिंहस्थपूर्व काळातच नाशिक ते सापुतारा (Nashik- Saputara) हा संपूर्ण मार्ग अधिक सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने २०२४ मध्ये या महामार्गासाठी भूसंपादनाची प्राथमिक नोटीस काढून नागरिकांकडून हरकती मागविल्या होत्या. मात्र कोणतीही हरकत न आल्याने आता अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
3 जिल्ह्यांना थेट फायदा, पर्यटन व व्यापाराला चालना :
या चौपदरी महामार्गाचा लाभ केवळ नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही. धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांनाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. धुळे-मालेगाव मार्गे नाशिक व पुढे वणी येथे हा महामार्ग जोडला जाणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा-धुळे-मालेगाव मार्गे येणाऱ्या वाहनांना सापुतारा, हातगड आणि नाशिककडे जाण्यासाठी सुरक्षित आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. (Nashik Saputara four lane road)
गुजरातकडून सापुतारा-हातगड मार्गे येणारी वाहतूकही या चौपदरी महामार्गाला जोडली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन, व्यापार आणि कृषी मालवाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.






