Maharashtra Board Exams 2026 | राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बोर्ड परीक्षांबाबत नवे आणि कडक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
राज्य मंडळाने यापूर्वीच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, 23 जानेवारी 2026 पासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थी जोरदार अभ्यासात व्यस्त आहेत. अशातच परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कोणत्याही गैरप्रकाराविना पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आणि कंपाउंड भिंत बंधनकारक :
राज्यभरातील सर्व परीक्षा केंद्रांना आता वॉल कंपाउंड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या केंद्रांवर कंपाउंड भिंत नसल्याचे किंवा ती तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले, त्या ठिकाणी तातडीने भिंत उभारण्याचे किंवा तारेचे कुंपण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक परीक्षा केंद्रांवर हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यासोबतच प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कॅमेरे उपलब्ध नव्हते, तिथे नवीन कॅमेरे बसवण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. परीक्षा सुरू असताना संपूर्ण केंद्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार असून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Board Exams 2026 | झूम अॅपद्वार थेट नियंत्रण; पर्यवेक्षकांची अदलाबदल :
यंदा प्रथमच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल फोन जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. झूम अॅपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष वेळेत नजर ठेवली जाणार असून पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सतत सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान घडणारी प्रत्येक घडामोड नियंत्रण कक्षाच्या थेट संपर्कात राहणार आहे.
तसेच शहरातील पर्यवेक्षकांना ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातील पर्यवेक्षकांना शहरातील किंवा इतर केंद्रांवर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओळखीच्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, पारदर्शकता वाढावी आणि शिस्त पाळली जावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Board Exams 2026)
राज्य शिक्षण मंडळ, जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवणार असून, यंदाची दहावी-बारावी बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, निर्भेळ आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे आणि पालक व शाळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






