Maharashtra Election | राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असून, अनेक महापालिकांमध्ये महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. मात्र आता या निवडणुकांमध्येच एक मोठा ट्विस्ट समोर आला असून, काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (gram panchayat elections postponed)
जालना जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा प्रश्न ऐरणीवर :
जालना जिल्ह्यातील जवळपास ४७५ ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. मात्र याच काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत असल्यामुळे आणि परीक्षा हंगाम सुरू असल्याने ग्रामपंचायत निवडणुका घेणे कठीण ठरत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. (local body elections)
जर मुदत संपल्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत, तर या गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतींमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येची गावे असल्यामुळे स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Maharashtra Election | दहावी-बारावी परीक्षा कारणीभूत ठरणार? :
फेब्रुवारी महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्यामुळे निवडणुका घेणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड ठरत असल्याचं कारण पुढे करण्यात येत आहे. मतदान केंद्रे, शिक्षकांची नियुक्ती आणि कायदा-सुव्यवस्था यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. त्यामुळे परीक्षा आणि निवडणूक एकाच वेळी होणे टाळण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (gram panchayat elections postponed)
या घडामोडींमुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना आता काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतरच ग्रामपंचायत निवडणुकांचा नवा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






