Latur Murder Mystery | राज्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये लातूरमधील एक धक्कादायक आणि थरारक हत्याकांड समोर आले आहे. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विम्याचे एक कोटी रुपये मिळवण्याचा कट आखणाऱ्या आरोपीने एका निष्पाप इसमाची निर्दय हत्या केली. मात्र, अत्यंत बारकाईने आखलेला हा प्लॅन शेवटी एका छोट्या चुकीमुळे उघडकीस आला आणि संपूर्ण लातूर जिल्हा हादरून गेला. (ake Death Insurance Murder)
13 डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास औसा शिवारात एक कार जळत असल्याची माहिती 112 क्रमांकावर पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जळालेल्या कारमध्ये चालकाच्या सीटवर एका व्यक्तीचा सांगाडा आढळून आला. सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र तपास पुढे जाताच धक्कादायक सत्य समोर आले.
स्वतःच्या मृत्यूचा बनाव आणि थंड डोक्याने रचलेला कट :
तपासात उघड झाले की, आरोपी गणेश चव्हाण याने टर्म लाइफ इन्शुरन्सचे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. यासाठी त्याने दारूच्या नशेत असलेल्या एका अनोळखी इसमाला कारमध्ये लिफ्ट दिली. औसाच्या पुढे एका ढाब्यावरून चिकन आणून त्याला खायला दिल्यानंतर त्या इसमाला गुंगी आली. याच अवस्थेचा फायदा घेत गणेशने पुढे रेकी करून निर्दयपणे हा कट अमलात आणला.
आरोपीने त्या इसमाला चालकाच्या सीटवर बसवून सीट बेल्ट लावला. चार दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या माचिसच्या दहा बॉक्समधील काड्या कारमध्ये टाकण्यात आल्या. पेट्रोल टँकचे झाकण उघडे ठेवून कार लॉक करण्यात आली आणि पेट्रोल ओतून कार पेटवून दिली. त्यानंतर गणेश चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला.
Latur Murder Mystery | दोन्ही सिम बंद, पण चॅटिंगमुळे सुगावा :
गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वतःचे दोन्ही मोबाईल सिम बंद केले होते. मात्र, तो आपल्या मैत्रिणीशी दुसऱ्या क्रमांकाच्या मोबाइलवरून सतत चॅटिंग करत होता. हाच धागा पोलिसांसाठी निर्णायक ठरला. तपासादरम्यान मैत्रिणीच्या मोबाइलवरून झालेल्या चॅटिंगची माहिती मिळताच पोलिसांनी त्या क्रमांकाचे लोकेशन ट्रॅक केले. (Latur Murder Mystery)
सुरुवातीला लोकेशन कोल्हापूर, नंतर पुणे आणि त्यानंतर सिंधुदुर्ग दाखवत होते. अखेर पोलिस पथक लोकेशनच्या आधारे त्या ठिकाणी पोहोचले असता गणेश चव्हाण आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जबाजारीपणातून अनोळखी इसमाची हत्या :
चौकशीत गणेश चव्हाणने धक्कादायक कबुली दिली. तो कर्जबाजारी झाला असून, लोकांचे देणे आणि मुंबईतील फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी विम्याच्या पैशांसाठी हा कट रचल्याचे त्याने मान्य केले. औसातील तुळजापूर परिसरात दारूच्या नशेत असलेल्या एका अनोळखी इसमाला लिफ्ट देऊन त्याची हत्या केल्याचेही त्याने कबूल केले आहे.
या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, अत्यंत क्रूर आणि थंड डोक्याने आखलेला हा कट पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे उघडकीस आला आहे.






