Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकर संक्रांतीनिमित्त लाभार्थी महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या कडक निर्देशांमुळे हा निर्णय मागे घेण्यात आला असून, आता लाभार्थी महिलांच्या खात्यात केवळ 1500 रुपयेच जमा होणार आहेत. (Ladki Bahin Yojana December Installment)
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. याच आचारसंहितेमुळे सरकारला कोणताही नवीन किंवा अग्रिम लाभ देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे संक्रांतीनिमित्त एकत्रित स्वरूपात 3000 रुपये देण्याचा प्रस्ताव थांबवण्यात आला असून, यापूर्वी मंजूर करण्यात आलेला डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता देण्यासच परवानगी देण्यात आली आहे.
3000 रुपयांची घोषणा का रद्द झाली? :
डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकत्र देण्याची घोषणा निवडणुकांच्या तोंडावर करण्यात आली होती. मात्र, यावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला. आचारसंहिता लागू असताना दोन महिन्यांचा लाभ एकत्र देणे म्हणजे अग्रिम स्वरूपाचा फायदा देण्यासारखे असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर आयोगाने या निर्णयाची गंभीर दखल घेत शासनाकडे स्पष्टीकरण मागवले.
मुख्य सचिवांनी आयोगाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले की, 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आदेशांनुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू असलेल्या योजनांचा नियमित लाभ देता येतो; मात्र कोणताही नवीन, वाढीव किंवा अग्रिम स्वरूपाचा लाभ देता येत नाही. याच कारणामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता सध्या देण्यास मनाई करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana | आता लाभार्थींना किती रक्कम मिळणार? :
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर केवळ डिसेंबर महिन्याचे 1500 रुपयेच जमा होणार आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता हा अग्रिम स्वरूपात असल्याने तो आचारसंहिता काळात देता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक क्षेत्रांतील लाभार्थी महिलांवर होणार आहे. तसेच आचारसंहिता लागू असताना नवीन लाभार्थी निवडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या नियमित आणि प्रलंबित लाभ देण्यास परवानगी असली तरी अतिरिक्त किंवा सणासुदीचा लाभ देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojana December Installment)
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी संक्रांतीला 3000 रुपयांची अपेक्षा ठेवलेल्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला असल्याचे चित्र आहे.






