Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून फेब्रुवारी 2026 चा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हप्त्याच्या वितरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
फेब्रुवारी हप्त्यासाठी 277 कोटींचा निधी :
राज्य सरकारने फेब्रुवारी 2026 चा 1500 रुपयांचा हप्ता वितरित करण्यासाठी सुमारे 277 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. (Maharashtra Ladki Bahin Scheme)
याआधी जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वितरित होणार असल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana | ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. (Ladki Bahin Yojana)
यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने दुरुस्ती करून घ्यावी. अन्यथा या योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






