आयपीएल 2025 स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असताना 6 एप्रिल रोजी होणाऱ्या एका सामन्यावर अनपेक्षित संकट कोसळलं होतं. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत सुरक्षेच्या कारणास्तव संभ्रम निर्माण झाला होता. अखेर बीसीसीआयने वेळीच निर्णय घेऊन हे संकट दूर केलं आहे.
6 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार असल्याने कोलकात्यात योग्य प्रमाणात सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही, असं स्थानिक प्रशासनाने कळवलं होतं. त्यामुळे कोलकात्यात होणाऱ्या सामन्याच्या स्थळाबाबत शंका निर्माण झाली होती. कोलकाता पोलिस आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बीसीसीआयला यासंबंधी सूचना दिली होती.
कोलकात्याऐवजी गुवाहाटीत सामना; वेळ आणि तारीख कायम :
बीसीसीआयने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत त्वरित निर्णय घेतला आहे. 6 एप्रिलला होणारा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचा स्थळ बदलण्यात आला आहे. हा सामना आता कोलकात्याऐवजी गुवाहाटी येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर याच दिवशी रात्री 7.30 वाजता हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे.
IPL 2025 स्पर्धेतील डबल हेडर सामन्यांची संख्या 12 आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करणं मोठं आव्हान होतं. पण बीसीसीआयने वेळ न दवडता तोडगा शोधून सामन्याचं आयोजन सुरक्षितपणे पार पाडण्याची तयारी केली आहे.
KKR Vs LSG l 10 संघ, 74 सामने, 13 शहरं :
IPL 2025 मध्ये एकूण 10 संघांचा सहभाग असून 65 दिवसांत 74 सामने खेळवले जाणार आहेत. देशातील 13 विविध ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. यामध्ये 62 सामने हे संध्याकाळी तर 12 सामने दुपारी खेळवले जातील.
22 मार्च रोजी या स्पर्धेचा पहिला सामना पार पडणार असून गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी IPL 2025 ही पर्वणी ठरणार आहे, यावर शंका नाही.






