Pune Crime | संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर (Gokulnagar) परिसरात आर्थिक वादातून एका ३१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा धक्कादायक प्रकार त्याच्या जवळच्या मित्रांनीच केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्यरात्री अपहरण, विवस्त्र करणे, मारहाण, व्हिडीओ चित्रीकरण आणि थेट गोळीबाराचा प्रयत्न या सर्व बाबींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं? :
पीडित तरुण हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो आणि तो कोंढवा परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी हे त्याचे ओळखीचे असून, त्यांच्यात काही काळापासून आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. हा वाद इतका चिघळला की ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले.
यानंतर त्याला कात्रज-कोंढवा (Katraj- Kondhawa) रस्त्यावरील गोकुळनगरजवळील एका सुनसान आणि मोकळ्या मैदानात नेण्यात आले. तिथे आरोपींनी त्याला पूर्णपणे विवस्त्र केले आणि लाथाबुक्क्यांनी, क्रूरपणे मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली.
Pune Crime | पिस्तुलाचा धाक, जीवे मारण्याची धमकी :
या अमानुष छळादरम्यान आरोपी मंगेश माने याने कारमधील पिस्तुल दाखवून पीडिताला धमकावल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पीडितावर गोळीबाराचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र सुदैवाने तो यातून बचावला.
घटनेनंतर प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणाने अखेर धैर्य एकवटून येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. (Yevlewadi Police Station)
या प्रकरणात आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल ऊर्फ ऋषी मोरे यांच्यासह एकूण नऊ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही घटना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे भयावह वास्तव समोर आणणारी ठरत असून, आर्थिक वादातून हिंसक मार्ग स्वीकारण्याचे गंभीर परिणाम समाजासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येवलेवाडी पोलीस करत असून, लवकरच फरार आरोपींनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






