Kerala Name Change | केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. यापुढे हे राज्य “केरळम” या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य विधानसभेने मंजूर केलेला ठराव केंद्राकडे पाठवण्यात आला होता आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावबदलाला औपचारिक मान्यता मिळाली आहे.
विधानसभेचा ठराव आणि केंद्राची मंजुरी :
केरळ विधानसभेने (Kerala Legislative Assembly) 24 जून 2024 रोजी एकमताने ठराव मंजूर करत राज्याचे नाव “केरळ” वरून “केरळम” असे करण्याची शिफारस केली होती. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्येही असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) काही तांत्रिक बाबींचा उल्लेख करत सुधारणा सुचवल्या होत्या.
त्या सूचनांनुसार सुधारित ठराव पुन्हा मंजूर करून केंद्राकडे पाठवण्यात आला. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय जाहीर झाला. राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीचा सन्मान राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Kerala Name Change | मुख्यमंत्र्यांचा पुढाकार आणि पुढील प्रक्रिया :
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (Pinarayi Vijayan) यांनी राज्याचे मूळ आणि स्थानिक उच्चार प्रतिबिंबित करणारे “केरळम” हे नाव अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव “केरळम” असे नमूद व्हावे, अशी त्यांची भूमिका होती. स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यासाठी नावबदल आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता.
पंतप्रधान कार्यालयाच्या नव्या ‘सेवा तीर्थ’ (Seva Teerth) इमारतीत झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. सर्व सरकारी कागदपत्रे आणि विविध भाषांमधील उल्लेखांमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. या निर्णयावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी राज्य सरकारच्या मते या बदलामुळे राज्याची स्थानिक ओळख अधिक ठळक होईल.






