Kasba Ganpati Temple | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराचे ग्रामदैवत मानले जाणारे कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबरपासून भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. हा निर्णय मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर कवच दुरुस्तीची अत्यंत नाजूक प्रक्रिया राबवण्यासाठी घेतला गेला आहे. त्यामुळे काही दिवस भक्तांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.
कसबा गणपती देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार यांनी सांगितले की, मंदिराच्या नोंदवलेल्या इतिहासात प्रथमच अशी प्रक्रिया होत आहे. स्वयंभू मूर्तीवरील शेंदूर मिश्रित आवरण गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी खाली सोलू लागले आहे. भविष्यात मूर्तीला कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून तातडीने शेंदूर कवच काढण्याचे आणि त्याची पुनर्व्यवस्था करण्याचे काम सुरू केले जात आहे.
शेंदूर कवच दुरुस्तीची प्रक्रिया सुरू :
कसबा गणपती मंदिरातील मूळ पूजेच्या मूर्तीवरील शेंदूर अनेक वर्षांपासून नियमितपणे करण्यात येणाऱ्या पारंपरिक प्रक्रिया आणि हवामान बदलांमुळे सैल होऊ लागला आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मूर्तीवर कोणताही अपाय होऊ नये म्हणून या प्रक्रियेसाठी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, मूर्तीतज्ज्ञ, तसेच धार्मिक शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. दुरुस्तीची प्रत्येक पायरी शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणार आहे. (Kasba Ganpati Temple)
ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने अंदाजे तीन आठवडे लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र काम सुरू झाल्यानंतर वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. कामाची प्रगती लक्षात घेऊन मंदिर पुन्हा लवकरात लवकर भक्तांसाठी खुले करण्याचा देवस्थान ट्रस्टचा प्रयत्न असेल, असेही ठकार यांनी सांगितले.
Kasba Ganpati Temple | पुण्याच्या इतिहासातील महत्वाचे मंदिर :
कसबा गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. इसवी सन 1614 च्या सुमारास या मंदिराचा उल्लेख मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः “जयति गजानन” म्हणून ज्यांचे वर्णन केले, तेच हे आराध्यदैवत. पुण्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेत या मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गणेशोत्सवात कसबा गणपती हा ‘मानाचा पहिला’ गणपती असल्याने भाविकांची श्रद्धा येथे अधिकच खोल आहे.
दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे मंदिर बंद राहणार असल्याची घोषणा अनेकांसाठी अचानक धक्का असला तरी मूर्तीच्या सुरक्षेसाठी आणि भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.






