काळजाचा थरकाप! स्लीपर बसला भीषण आग; चालकासह १३ जणांचा होरपळून मृत्यू

On: December 25, 2025 12:26 PM
Karnataka Road Accident
---Advertisement---

Karnataka Road Accident | कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे घडलेल्या एका भीषण रस्ता अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बंगळुरूहून शिमोग्गामार्गे गोकर्णकडे जाणाऱ्या खासगी स्लीपर बसचा राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघात झाला. हिरियूर तालुक्यातील गोरलाथू क्रॉसजवळ बस आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन बसला आग लागली. या दुर्घटनेत चालकासह किमान 13 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघात इतका भीषण होता की काही मिनिटांतच स्लीपर कोच बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. बसमध्ये प्रवास करणारे अनेक प्रवासी झोपेत असल्याने बाहेर पडण्यास त्यांना वेळच मिळाला नाही. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून महामार्गावरील वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली.

कसा झाला अपघात? पोलिसांचा प्राथमिक तपास :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरियूरहून बंगळुरूकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक सेंट्रल डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या स्लीपर बसला जोरदार धडक दिली. ही बस बंगळुरूहून शिवमोग्गाकडे जात होती. धडकेनंतर बस महामार्गाच्या मधोमध उलटली आणि लगेचच तिला आग लागली. या आगीत अनेक प्रवासी बसमध्येच अडकले, त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली. (Karnataka Road Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृतांचा आकडा 17 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की घटनास्थळावरील तपास, ऑडिट आणि पोस्टमॉर्टेमनंतरच मृतांची अधिकृत संख्या जाहीर केली जाईल. बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालेल्या प्रवाशांपैकी अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Karnataka Road Accident | कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणाचा संशय :

पोलिसांच्या प्राथमिक तपासात कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा या अपघातामागे कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे कंटेनर थेट डिव्हायडर ओलांडून बसवर आदळल्याचं सांगितलं जात आहे. आगीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनलं होतं. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. (Sleeper Bus Fire)

चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रंजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकार्याचा आढावा घेतला आहे. हिरियूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वर अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती. ढिगारा हटवण्याचे आणि मदतकार्य पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

News Title: Karnataka Bus Accident: 13 Killed as Sleeper Bus Catches Fire After Collision in Chitradurga

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now