Awhad & Padalkar Clash | पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या गोंधळासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत झालेल्या हाणामारीची चौकशी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोंधळाचा संपूर्ण घटनाक्रम तपासला :
पावसाळी अधिवेशनादरम्यान लॉबीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार ढकलाढकली, शाब्दिक चकमक आणि मारहाण झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. या प्रकाराचे पडसाद सभागृहातील कामकाजावरही दिसून आले. घटनाक्रम गंभीर असल्याने विधिमंडळ शिस्तभंग समितीने व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्रत्यक्षदर्शी सदस्यांचे जबाब आणि सुरक्षा अहवालांच्या आधारे तपास सुरू केला होता.
तपासात पडळकर (Padalkar) यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले (Rushikesh takle) आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख (Nitin deshmukh) यांना या प्रकरणातील प्रमुख दोषी मानण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणातील या दोघांची चौकशी झाल्यानंतर समितीने कठोर दंडात्मक कारवाईची प्राथमिक शिफारस केली आहे.
Awhad & Padalkar Clash | तुरुंगवासाची शिफारस? :
मिळालेल्या माहितीनुसार, शिस्तभंग समितीने टकले आणि देशमुख या दोघांवर तुरुंगवासाची शिक्षा देण्याचीही शिफारस केल्याचे संकेत आहेत. समितीचा अहवाल आता सभापती आणि विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार असून पुढील काही दिवसांत या प्रकरणी अंतिम निर्णय जाहीर होऊ शकतो.
दरम्यान, या प्रकरणाचा अंतिम निर्णय आता सभापतींकडे असून, विधानभवनातील शिस्तभंगासाठी हे सर्वात कठोर निर्णयांपैकी एक ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






