Jaya Bachchan Controversy | बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली लोकप्रियता टिकवणाऱ्या अभिनेत्री आणि सध्या राज्यसभेतील सक्रिय सदस्य असलेल्या जया बच्चन यांच्याभोवती पुन्हा एकदा वादाचा भोवरा निर्माण झाला आहे. त्यांच्या काही व्हिडीओंमध्ये दिसणारा राग आणि पापाराझींशी तणावपूर्ण वागणूक अनेकदा चर्चेचा विषय बनलेला आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पापाराझींविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. (Jaya Bachchan Controversy)
जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात. विशेषतः रागावलेले चेहरे, पापाराझींवर केलेले ताशेरे आणि चाहत्यांशी तुसडे बोलण्यामुळे त्या सतत ट्रोल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका वयस्कर महिला चाहतीने फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता जया बच्चन यांनी तिला सर्वांसमोर झापल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांच्या पापाराझींशी असलेल्या वादाची नवी मालिका सुरू झाली आहे.
मुलाखतीतील वक्तव्यावर संताप :
जया बच्चन यांनी मुलाखतीत थेट म्हटले की, “मी मीडियाचा सन्मान करते पण पापाराझींचा नाही.” त्यांनी अधिक बोलताना मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढणाऱ्यांना उद्देशून “ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते स्वतःला पत्रकार समजतात” अशा शब्दांत टीका केली. पापाराझी दिसले की त्या त्यांना ‘घाणेरडे लोक’, ‘कोणी बोलावलं?’ अशा शब्दांत सुनावतात, हे अनेकदा कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
या विधानानंतर जया बच्चन यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे. अनेकांनी त्यांच्या वागण्याला उद्धटपणा म्हणून संबोधले असून त्यांच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही जया बच्चन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Jaya Bachchan Controversy | अशोक पंडित यांची थेट टिप्पणी – “असं बोलणं शोभत नाही” :
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी जया बच्चन यांच्या वक्तव्यावर कडवी प्रतिक्रिया देत म्हटले की, “एखाद्या क्षेत्रातील कामाला कमी लेखणे अत्यंत चुकीचे आहे. चुकीचे कव्हरेज असेल तर टीका करा, पण संपूर्ण व्यवसायालाच वाईट म्हणणे योग्य नाही.” पुढे ते म्हणाले की, पापाराझी हे अत्यंत मेहनत करणारे लोक आहेत आणि ते फक्त आपले काम करत आहेत.
अशोक पंडित यांनी हेही सांगितले की, बऱ्याचदा कलाकारांची पीआर टीम स्वतः पापाराझींना बोलावते. त्यामुळे जया बच्चन यांना हा कल्चर आवडत नसेल तर प्रथम स्वतःच्या वर्तणुकीकडे पाहायला हवं. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातून बाहेर पडताना जया बच्चन पुन्हा पापाराझींवर चिडताना आढळल्या. त्यानंतर मुलगी श्वेता बच्चन हिने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गाडीत बसवले.
जया बच्चन यांचे वक्तव्य, त्यांचा पापाराझींशी असलेला तणाव आणि त्यावर वाढणारी टीका हे सर्व लक्षात घेता सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या वागण्यावर जोरदार चर्चा रंगली आहे. आगामी काळात त्या या प्रकरणावर स्पष्टीकरण देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






