IPL 2025 l आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बदली खेळाडूंशी संबंधित एक नवा नियम लागू केला आहे. या नियमामुळे स्पर्धेतील संघांना त्यांच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. हा नियम कसा कार्यान्वित होणार आणि संघांना याचा कसा फायदा होणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘Replacement Rule’ म्हणजे नेमकं काय? :
आयपीएल २०२५ मध्ये बीसीसीआयने बदली खेळाडूंच्या निवडीसाठी काही विशिष्ट नियम लागू केले आहेत. या नियमानुसार, जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे हंगामातून बाहेर पडला, तर संघ त्याच्या जागी नवीन खेळाडूची निवड करू शकतो. हा नियम हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगामादरम्यानही लागू राहणार आहे.
यंदाच्या बदलांनुसार, याआधी बदली खेळाडूची निवड केवळ सातव्या सामन्यापर्यंत करता येत होती, मात्र आता ही मर्यादा वाढवून १२व्या सामन्यापर्यंत करण्यात आली आहे. यामुळे संघांना जास्त काळपर्यंत त्यांच्या खेळाडूंच्या स्थितीचा विचार करून बदल करण्याची संधी मिळणार आहे.
बदली खेळाडूंशी संबंधित अटी :
RAPP पूलमध्ये नोंदणी: बदली खेळाडू आधीच ‘Registered Available Player Pool’ (RAPP) मध्ये नोंदणीकृत असावा. म्हणजेच, तो आधीपासून बीसीसीआयच्या अधिकृत यादीत असावा.
फी मर्यादा: बदली खेळाडूच्या कराराची किंमत मूळ खेळाडूच्या करारापेक्षा जास्त असू शकत नाही.
IPL 2025 l स्पर्धेदरम्यान लागू असलेल्या अटी :
बदली खेळाडूची घोषणा: बदली खेळाडूचा समावेश १२व्या लीग सामन्यापर्यंत करण्यात यावा.
बीसीसीआयच्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र: ज्या खेळाडूची जागा रिकामी झाली आहे, त्याला हंगाम संपेपर्यंत खेळता येणार नाही, याची अधिकृत वैद्यकीय पुष्टी असणे आवश्यक आहे.
पुनरागमनाच्या संधी नाहीत: ज्या खेळाडूची जागा घेतली आहे, तो खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये इतर कोणत्याही संघासाठी खेळू शकणार नाही.
या नियमामुळे संघांना त्यांच्या संघरचनेत अधिक लवचिकता मिळणार आहे. दुखापतीमुळे खेळाडू बाहेर गेल्यास, त्याची जागा तातडीने भरून काढता येईल. यामुळे स्पर्धेतील चुरस अधिक वाढेल आणि प्रत्येक संघाला त्यांच्या रणनीतीनुसार खेळाडू बदलण्याची संधी मिळेल.
आयपीएल २०२५ मधील प्रमुख बदली खेळाडू :
कोलकाता नाईट रायडर्स – उमरान मलिकच्या (७५ लाख) जागी चेतन सकारिया (७५ लाख)
मुंबई इंडियन्स – अल्लाह गझनफरच्या (४.८ कोटी) जागी मुजीब उर रहमान (२ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद – ब्रायडन कार्सच्या (१ कोटी) जागी वियान मुल्डर (७५ लाख)






