गोलंदाजांसाठी आनंदाची बातमी, IPL पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय

On: March 21, 2025 11:27 AM
IPL 2025 BCCI Lifts Saliva Ban
---Advertisement---

IPL 2025 | आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेच्या तोंडावर बीसीसीआयने (BCCI) गोलंदाजांसाठी एक मोठा आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून लागू असलेली लाळ वापरण्यावरची बंदी अखेर उठवण्यात आली आहे. त्यामुळे गोलंदाजांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाळ वापरण्यावर आयसीसीने (ICC) बंदी घातली होती. त्यानंतर बीसीसीआयनेही आयपीएलमध्ये हा नियम लागू केला. त्याआधी चेंडू शाईन करण्यासाठी लाळ आणि घामाचा वापर करण्यात येत होता. पण पाच वर्षांपासून लाळेवर बंदीमुळे गोलंदाजांची कामगिरी मर्यादित झाली होती.

गोलंदाजांना स्विंगसाठी मोठा दिलासा

लाळ वापरून चेंडूवर शाईन आणल्यास स्विंग आणि रिव्हर्स स्विंगला मदत होते. या बंदीमुळे अनेक गोलंदाजांनी बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त करत परवानगीची मागणी केली होती. अखेर आयपीएलच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

BCCI कडून अधिकृत माहिती

गुरुवारी (20 मार्च 2025) मुंबईत झालेल्या सर्व IPL संघांच्या कर्णधारांच्या बैठकीत बीसीसीआयने लाळेवरील बंदी हटवल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “कर्णधार या निर्णयाच्या बाजूने होते. त्यामुळे बंदी उठवण्यात आली.”

आयसीसीने 2022 मध्येच लाळ वापरण्यावर कायमस्वरूपी बंदी कायम ठेवली आहे. मात्र आयपीएल ही अशी पहिली मोठी स्पर्धा ठरली आहे जी लाळ वापरण्यास पुन्हा परवानगी देत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या विजयानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने लाळ वापरण्याच्या मुभेसाठी सार्वजनिक विनंती केली होती. त्याने म्हटलं होतं, “रिव्हर्स स्विंगची कला टिकवण्यासाठी लाळ वापरणे गरजेचे आहे.”

गोलंदाजांसाठी आनंदाची बातमी

हा निर्णय विशेषतः स्पिन आणि वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे चेंडूवर नियंत्रण मिळवणे, स्विंग आणि विविधतेचा वापर अधिक प्रभावी होईल.

Title : IPL 2025 BCCI Lifts Saliva Ban for Bowlers After 5 Years

 

Join WhatsApp Group

Join Now