Mohammad Rizwan l दुबईमध्ये (Dubai) झालेल्या सामन्यात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने भारतीय संघाचे कौतुक केले. तो म्हणाला, “भारतीयांनी आमच्यापेक्षा जास्त सरस प्रयत्न केले. त्यांचा खेळ खूपच धाडसी होता. ज्या वेळी आक्रमक खेळण्याची गरज होती, त्या वेळी आम्ही ते दाखवू शकलो नाही.”
रिझवानची कबुली :
रिझवानने पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले, “आम्ही खेळाच्या तिन्ही क्षेत्रांत चुका केल्या. किमान 270-280 धावांचे लक्ष्य ठेवण्याचे ठरवले होते, पण आमची फटक्यांची निवड चुकली. त्यामुळे त्यांना विकेट घेणे शक्य झाले आणि आमच्यावरील दडपणही वाढले. आम्ही डावाला स्थैर्य देऊ शकलो नाही.”
क्षेत्ररक्षणातील चुका :
क्षेत्ररक्षणाच्या वेळीही आवश्यक असलेला उत्साह आमच्यात नव्हता. आमच्याकडून सातत्याने त्याच चुका होत आहेत, असेही रिझवानने नमूद केले.
“एक कर्णधार या नात्याने मला दुसऱ्या संघांवर अवलंबून राहणे आवडत नाही. सामने जिंकून तुम्हीच तुमची वाटचाल करायला हवी. आम्ही भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पराभूत झालो आहोत आणि ते स्वीकारले आहे. त्यांनी आमच्यापेक्षा खूपच भक्कम खेळ केला,” असे रिझवानने सांगितले.






