ICC ODI Ranking l चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) संपल्यानंतर आयसीसीने (ICC) नव्या वनडे रँकिंगची घोषणा केली असून यात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. टीम इंडियाने फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत स्पर्धा जिंकली. या विजयामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारतीय फिरकीपटूंना मोठा फायदा झाला आहे. दुसरीकडे, विराट कोहली (Virat Kohli) च्या रँकिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) टॉप 3 मध्ये पोहोचला असून रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे.
रोहित शर्माची रँकिंगमध्ये झेप :
भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये 76 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण स्पर्धेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असला तरी, रँकिंगच्या बाबतीत रोहितने मोठी झेप घेतली आहे. आयसीसीच्या नव्या वनडे फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्माला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर शुभमन गिल (Shubman Gill) असून श्रेयस अय्यर आठव्या स्थानी कायम आहे. या उलट, विराट कोहलीच्या स्थानात घसरण झाली आहे. तो चौथ्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर गेला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने दमदार खेळी केली होती, तसेच न्यूझीलंडविरुद्धही 84 धावा केल्या होत्या, तरीही त्याला रँकिंगमध्ये घसरण सहन करावी लागली आहे.
ICC ODI Ranking l भारतीय फिरकीपटूंचा दबदबा :
गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय फिरकीपटूंनी चांगली मजल मारली आहे. कुलदीप यादवने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून न्यूझीलंडचा मिचेल सॅंटनर (Mitchell Santner) दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत न खेळूनही श्रीलंकेचा महेश दीक्षणा (Maheesh Theekshana) पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
रवींद्र जडेजाने टॉप 10 मध्ये स्थान मिळवले असून वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) 16 व्या स्थानावरून मोठी झेप घेतली आहे. या बदलांमुळे भारतीय फिरकीपटूंचा दबदबा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाढताना दिसत आहे.






