Pune Water Park Accident | पुणे जिल्ह्यातील एका प्रसिद्ध वॉटरपार्कमध्ये भीषण दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉटर स्लाइडवरून घसरताना झालेल्या अपघातात एका पर्यटक महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वॉटरपार्कमधील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने अनेकजण उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी वॉटरपार्ककडे वळत आहेत. मुंबईप्रमाणेच पुण्यातील वॉटरपार्कमध्येही पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशाच सहलीसाठी आलेल्या एका महिलेबाबत ही गंभीर दुर्घटना घडली आहे. (Jai Malhar Water Park Pune)
वॉटर स्लाइडवरून घसरताना अपघात :
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी संदीप नप्ते (वय 37) या आपल्या कुटुंबासह पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटर पार्क येथे सहलीसाठी गेल्या होत्या. वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्यामुळे त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या. (Morachi Chincholi Water Park Accident)
घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये तातडीची वैद्यकीय मदत किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.
Pune Water Park Accident | पाठीचे चार मणके तुटले, गंभीर दुखापत :
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे सांगितले. या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या शरीराचा खालचा भाग कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी महिलेचे नातेवाईक किरण नप्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे वॉटरपार्कचे मालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.






