Chhatrapati Sambhajinagar | एबी फॉर्म दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी नाकारण्यात आल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातला. अचानक उफाळलेल्या या हायहोल्टेज ड्रामामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनाही परिस्थिती आवरण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. (BJP Candidate Displeasure)
महायुती तुटल्यानंतर आपल्याला सहज उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा अनेक इच्छुकांनी बाळगली होती. मात्र प्रत्यक्षात तिकीट कापल्याचं समजताच संतप्त कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. महिला उमेदवारांनी जोरदार आक्रोश केला, तर काही पुरुष उमेदवारांनी कार्यालयाबाहेर उभारलेल्या पेंडॉलमध्येच ठिय्या केला, यामुळे काही वेळातच हा वाद हाताबाहेर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
तिकीट नाकारल्याने अश्रू, घोषणाबाजी आणि गंभीर आरोप :
वॉर्ड क्रमांक 22 सह इतर काही वॉर्डांमध्ये इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अनेकांच्या भावना अनावर झाल्या. काही उमेदवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर त्यांच्या कुटुंबीयांनीही संताप व्यक्त केला. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या लता दलाल यांनाही उमेदवारी नाकारल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी करत थेट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
काही इच्छुक उमेदवारांनी थेट पैसे घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप केला. गेली अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही नव्याने आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचा पारा चढला आणि भाजप रसातळाला चालल्याचा आरोपही करण्यात आला.
Chhatrapati Sambhajinagar | महिलेला भोवळ, बंडखोरीची शक्यता वाढली :
या गोंधळात शिवाजीनगर परिसरातून उमेदवारीसाठी आलेल्या एका महिलेला भोवळ आल्याची घटना घडली. पक्षासाठी रक्त आटवून काम केल्याचं सांगत तिने भावनिक प्रतिक्रिया दिली. कोर्ट केसेस, आंदोलनं आणि संघर्ष करूनही शेवटी डावलण्यात आल्याचा आरोप तिने नेत्यांवर केला. यावेळी मंत्री अतुल सावे यांची भेट घेण्याचा आग्रह धरल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं आणि त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. (AB Form Controversy)
दरम्यान, उमेदवारी नाकारण्यात आलेल्या अनेकांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. काही महिला उमेदवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाडणार असल्याचं जाहीर केल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरी उफाळण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकीत विरोधकांपेक्षा बंडखोरांचाच अधिक फटका भाजपला बसण्याची चिन्हं दिसत असून, पक्ष नेतृत्वासमोर ही नाराजी शांत करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.






