सावधान! ‘या’ ३ दिवशी मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

On: December 24, 2025 12:43 PM
Rain Alert
---Advertisement---

Rain Alert | राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कधी अचानक थंडी वाढतेय तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला असून 24, 25 आणि 26 डिसेंबरदरम्यान देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra weather update)

डिसेंबर महिन्यातील थंडीने यंदा अनेक विक्रम मोडले आहेत. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक एक अंकी किमान तापमानाची नोंद यावर्षी झाली असून पुण्यासह अनेक शहरांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. डिसेंबरच्या अवघ्या 23 दिवसांत तब्बल 13 दिवस किमान तापमान एक अंकी नोंदले गेले असून हा गेल्या दशकातील मोठा विक्रम मानला जात आहे.

राज्यात थंडीचा कहर, काही ठिकाणी तापमान 6 अंशांवर :

राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर अधिक वाढला आहे. धुळे जिल्ह्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड येथे तापमान थेट 5.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. परभणीत 7.5 अंश, तर नाशिक, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथे 10 अंशांच्या आसपास तापमान नोंदवले गेले आहे. थंडीबरोबरच सकाळच्या वेळेत गारठाही मोठ्या प्रमाणात जाणवत असून मुंबईसारख्या शहरातही थंडीची चाहूल लागली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, जानेवारी महिन्यातही ही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारे आणि शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून संपूर्ण डिसेंबर महिना थंड राहणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. यंदाचा डिसेंबर हा 2014 नंतरचा सर्वात थंड डिसेंबर ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.

Rain Alert | देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट :

थंडीच्या पार्श्वभूमीवरच भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. 24, 25, 26 आणि 27 डिसेंबरदरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, लडाख, कर्नाटक, अंदमान, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॉन्सून संपून अनेक महिने झाले असले तरी काही भागांमध्ये अजूनही पावसाची स्थिती कायम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबई आणि पुण्यात हवा घातक पातळीवर पोहोचल्याने श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्य समस्या वाढताना दिसत आहेत. हवामानातील हा दुहेरी प्रभाव एकीकडे तीव्र थंडी आणि दुसरीकडे पावसाचा इशारा नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

News Title: Heavy Rain Alert for December 24, 25 and 26; Cold Wave Continues Across Maharashtra and India

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now