सावधान! उन्हाचा तडाखा वाढला; उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा

On: March 11, 2026 5:11 PM
Heatwave Alert
---Advertisement---

Heatwave Alert Maharashtra | महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः उष्माघाताचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात तापमान झपाट्याने वाढत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे, मळमळ, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम :

सामान्य परिस्थितीत मानवी शरीराचे तापमान सुमारे 36.4 ते 37.2 अंश सेल्सिअस दरम्यान असते. मात्र बाहेरील तापमान खूप वाढल्यास शरीरावर त्याचा ताण येऊ लागतो. अशा वेळी अंगावर पुरळ येणे, हात-पाय किंवा घोट्याला सूज येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

उष्णतेचा परिणाम अधिक वाढल्यास उष्माघातासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये चक्कर येणे, उलट्या होणे, अतितहान लागणे, श्वासोच्छवास जलद होणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसतात. काही वेळा हृदय, श्वसन किंवा किडनीच्या जुन्या आजारांवरही अतिरिक्त ताण येऊ शकतो.

Heatwave Alert Maharashtra | उष्माघाताची लक्षणे आणि प्रथमोपचार :

प्रौढ व्यक्तींमध्ये उष्माघात झाल्यास डोकेदुखी, ताप, उलट्या, प्रचंड घाम येणे, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा मानसिक गोंधळ, चिडचिड, नाडी असामान्य होणे किंवा शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाणे अशी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. (Heatwave Alert Maharashtra)

मुलांमध्ये अन्न घेण्यास नकार, जास्त चिडचिड, लघवीचे प्रमाण कमी होणे, तोंड कोरडे पडणे, सुस्ती किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशी स्थिती आढळल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित सावलीत किंवा थंड जागी हलवणे आवश्यक आहे. शरीरावर थंड पाणी टाकणे किंवा ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे, पंख्याची हवा देणे आणि व्यक्ती शुद्धीवर असल्यास पाणी किंवा लिंबूपाणी देणे उपयुक्त ठरते. स्थिती गंभीर असल्यास तात्काळ 108 किंवा 102 या आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

उन्हापासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना :

उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी पिणे, ओआरएस, ताक, लिंबूपाणी किंवा कैरीचे पन्हे यांसारखी पेये घेणे फायदेशीर ठरते. आहारात हलके आणि ताजे अन्न तसेच टरबूज, खरबूज, काकडी किंवा संत्री यांसारखी फळे समाविष्ट करणेही उपयुक्त आहे.

बाहेर जाताना पातळ, सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे वापरणे, टोपी किंवा छत्रीचा वापर करणे आणि शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळणे गरजेचे आहे. मद्यपान, जास्त चहा-कॉफी किंवा साखरयुक्त थंड पेये टाळावीत. तसेच पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे.

News Title: Heatwave Alert in Maharashtra: Temperature Crosses 40°C; Know Heatstroke Symptoms and Safety Tips

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now