Government Hospital | राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय सेवांसाठी निश्चित शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह राज्यभरातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण व महिला रुग्णालयांमध्ये हे नियम लागू होणार असून, यामुळे आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या काही सेवा आता शुल्कासह मिळणार आहेत. 16 जानेवारी रोजी यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शस्त्रक्रिया, ICU आणि इतर वैद्यकीय सेवा :
या नव्या नियमांनुसार ओपीडी नोंदणीसाठी 5 रुपये, रुग्णालयात दाखल झाल्यास दररोज 10 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. रक्त तपासण्यांसाठी 15 रुपये, एक्स-रेसाठी 100 रुपये, डोक्याच्या CT स्कॅनसाठी 300 रुपये, छाती किंवा मणक्याच्या CT स्कॅनसाठी 400 रुपये, तर MRI साठी 1,000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
भूल देऊन केल्या जाणाऱ्या लहान-मोठ्या शस्त्रक्रियांसाठी 60 ते 160 रुपये शुल्क असेल, तर सांधा प्रत्यारोपणासाठी तब्बल 40,000 रुपये आकारले जातील. ICU मध्ये दाखल रुग्णांसाठी प्रतिदिन 100 रुपये, तर प्रत्येक हेमोडायलिसिससाठी 150 रुपये शुल्क लागणार आहे. नर्सिंग होममधील AC खोलीसाठी दररोज 150 रुपये आणि non-AC खोलीसाठी 75 रुपये आकारले जातील.
Government Hospital | प्रसूती, रुग्णवाहिका आणि सूट मिळणारे रुग्ण :
पहिली प्रसूती मोफत राहणार असून, दुसऱ्यासाठी 50 रुपये आणि तिसऱ्या व पुढील प्रसूतीसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल. रुग्णवाहिका सेवेसाठी प्रति किलोमीटर 5 रुपये आणि 8 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षेसाठी प्रति तास 30 रुपये शुल्क लागणार आहे. मृतदेह एम्बाल्मिंगसाठी 1,500 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिक, कैदी, न्यायालयीन प्रकरणातील रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थी तसेच काही विशेष संस्थांमधून पाठवलेले रुग्ण यांना पूर्वीप्रमाणेच मोफत उपचार मिळणार आहेत. प्रशासनाच्या मते या निर्णयामुळे सेवा व्यवस्थापन सुधारेल; मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोफत आरोग्यसेवा कमी होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.






