Gold Silver Price | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर मंगळवारी सकाळी मौल्यवान धातूंच्या भावांनी अचानक वरची वाट धरली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांपासून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांच्याच कपाळावर घाम फुटला आहे.
एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच सोनं आणि चांदीच्या वायदा किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. विशेष म्हणजे चांदीच्या दरात तर एका झटक्यात तब्बल हजारो रुपयांची उसळी दिसून आली, तर सोन्याचाही दर काही हजारांनी महागला आहे. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी चिंतेची ठरत आहे.
चांदीच्या दरात मोठी उसळी :
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 मार्च एक्सपायरी असलेल्या चांदीच्या वायदा करारात मंगळवारी व्यवहार सुरू होताच मोठी वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी चांदीचा दर प्रति किलो 2,36,261 रुपये होता. मात्र मंगळवारी तो थेट 21 हजार रुपयांनी वाढून 2,57,480 रुपयांवर पोहोचला. (MCX Gold Price)
जरी या वाढीनंतरही चांदीचे दर त्यांच्या लाइफ टाइम हायपेक्षा कमी असले, तरी ही उसळी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. 29 जानेवारी रोजी चांदीने 4,30,048 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्याचा दर अजूनही सुमारे 1,62,000 रुपयांनी स्वस्त आहे, मात्र वाढीचा वेग पाहता आगामी काळात पुन्हा चढती कळा पाहायला मिळू शकते.
Gold Silver Price | सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ :
चांदीप्रमाणेच सोन्याच्याही दरात मंगळवारी मोठी वाढ झाली आहे. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,991 रुपये होता. मात्र मंगळवारी व्यवहार सुरू होताच तो वाढून 1,49,485 रुपयांपर्यंत पोहोचला, म्हणजेच जवळपास 5,500 रुपयांची वाढ नोंदवली गेली.
सोन्याचा लाइफ टाइम हाय पाहता सध्याचा दर अजूनही कमी मानला जात आहे. एप्रिल एक्सपायरीच्या सोन्याने याआधी 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत आजचा दर अजूनही सुमारे 43,000 रुपयांनी स्वस्त आहे, मात्र बाजारातील तेजी पाहता गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. (Gold Silver Price News)
दरम्यान, स्थानिक सराफ बाजारातही या वाढीचा परिणाम जाणवत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात सुमारे 1,000 रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह दर 1,54,500 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची वाढ होऊन ती 2,67,800 रुपये प्रति किलोवर गेली आहे.
गेल्या तीन दिवसांत सतत घसरण झाल्यानंतर आज पुन्हा भाव वाढल्याने बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि जागतिक घडामोडी यांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






