Pune GBS l पुणे (Pune) जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (Guillain-Barre Syndrome) रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे. नव्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने, ‘जीबीएस’मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या ११ मृत्यूंपैकी केवळ ४ मृत्यू ‘जीबीएस’मुळे झाले असून, उर्वरित ७ मृत्यू संशयित म्हणून नोंदवण्यात आले आहेत.
दोन रुग्णांचा मृत्यू :
बुधवारी एकाही नवीन संशयित रुग्णाची नोंद झाली नाही. नांदेड सिटी (Nanded City) परिसरातील २६ वर्षीय तरुणीचा काशीबाई नवले रुग्णालयात (Kashibai Navale Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणीला १५ जानेवारी रोजी जुलाबाचा त्रास झाला होता. त्यानंतर औषधोपचार घेतल्याने त्रास कमी झाला. मात्र, २२ जानेवारी रोजी तिला अशक्तपणा आणि द्रव पदार्थ गिळण्यास त्रास होऊ लागला.
त्यानंतर तिला सह्याद्री रुग्णालयात (Sahyadri Hospital) दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन मंगळवारी (१८ फेब्रुवारी) तिचा मृत्यू झाला.
दौंड (Daund) येथील ३७ वर्षीय तरुणाचा ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला. हातांची कार्यक्षमता कमी झाल्याने या रुग्णाला १० फेब्रुवारी रोजी ‘ससून’मध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरवर (ventilator) उपचार सुरू असताना सोमवारी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात २११ रुग्णांची नोंद :
राज्यात आतापर्यंत ‘जीबीएस’च्या २११ रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे महापालिका क्षेत्रात ४२, नव्याने समाविष्ट गावांमध्ये १४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागांत ३३ आणि अन्य जिल्ह्यांमध्ये १० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील २११ पैकी १८३ रुग्णांना ‘जीबीएस’ झाल्याचे निदान झाले असून, २८ रुग्णांची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे.
News title : GBS Death Toll Rises to 11 in Pune






