Ganesh Naik | नवी मुंबईतील भूखंडांच्या प्रश्नावरून मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केली. रुग्णालये आणि उद्यानांसाठी मागितलेले भूखंड न मिळाल्यास मंत्रिपदाला अर्थ उरत नाही, असा थेट सवाल करत त्यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
भूखंडांवरून संताप व्यक्त :
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यातील वाद हा नवा नाही. दोघेही वेळोवेळी एकमेकांवर टीका करताना दिसतात. यावेळी मात्र नवी मुंबईतील जमिनींच्या मुद्द्यावरून नाईक अधिकच तीव्र शब्दांत बोलले. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालये आणि गार्डन उभारण्याच्या उद्देशाने भूखंडांची मागणी करण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
“जर जनतेच्या हितासाठी जमीनच मिळणार नसेल, तर मंत्रिपदाचा उपयोग काय?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम काही दलालांनी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. स्वतः ज्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत आहेत, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास विभागातून असे प्रकार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Ganesh Naik | भूखंड परत कराचा इशारा
आपला राग शांत करायचा असेल तर नवी मुंबईतील सर्व भूखंड परत द्यावेत, असा थेट इशारा गणेश नाईक यांनी दिला. गप्प बसण्यासाठी आपण मंत्रिपद स्वीकारलेले नाही, असे सांगत त्यांनी भूमिका अधिक ठाम केली. लोकांच्या गरजांसाठी जमिनी मिळाल्या नाहीत, तर सत्तेतील पदाला काहीच महत्त्व उरत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पक्षाने मंत्रिपदाची जबाबदारी दिल्याबद्दल आपण आभारी आहोत, असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, ही जबाबदारी जनतेच्या हितासाठी वापरणार आहेत. नवी मुंबईतील भूखंडांचा विषय पुढील काळात आणखी चिघळण्याची शक्यता असून, या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत.






