Voter List Check | मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून, संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आणि मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध शहरांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मुंबईत 227 जागांसाठी ही निवडणूक होत असून, भाजप-शिंदेसेना, ठाकरे बंधूंचे गट, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत एक कोटींपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Maharashtra Voting)
मतदार यादीत नाव कसे तपासायचे? :
मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. mahasecvoterlist.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचे नाव किंवा EPIC क्रमांक टाकून मतदार यादीतील नोंद तपासू शकता.
याशिवाय राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल voters.eci.gov.in वर देखील मतदारांना नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. येथे EPIC क्रमांकाच्या आधारे किंवा वैयक्तिक माहितीद्वारे मतदार यादीत नाव आहे की नाही, तसेच मतदान केंद्राचे तपशील एका क्लिकवर पाहता येतात. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही.
Voter List Check | मतदानासाठी आवश्यक कागदपत्रे आणि उमेदवारांची संख्या :
निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाईन ॲपद्वारेही मतदार यादीतील नाव तपासता येते. हे ॲप eci.gov.in वरून डाउनलोड करता येते. मतदानाच्या दिवशी मतदारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र तपासणीनंतरच मतदान करता येईल. (Maharashtra Municipal Election)
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी एकूण 2,869 जागांवर ही निवडणूक होत असून, तब्बल 15,931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक म्हणजे 1,700 उमेदवार मैदानात असून, पुण्यात 165 जागांसाठी 1,166 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नागपूरमध्ये 151 जागांसाठी 993 उमेदवार तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी 859 उमेदवार नशीब आजमावत आहेत. नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालना येथे पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होत आहे.






