Pune FDA action | राज्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या स्पष्ट आदेशानंतर आणि अंमलबजावणीचा आढावा घेतला जात असताना, पुणे एफडीएने राज्यभरातील हुक्का माफियांची साखळी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यात तब्बल ३२ कोटी रुपयांचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ३१ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या १९.४५ कोटी रुपयांच्या कारवाईचा धागा पकडत पुणे अन्न व औषध प्रशासनाने पुढील तपास सुरू केला. याच तपासातून मावळ तालुक्यातील टाकवे येथील एका खासगी कंपनीवर छापा टाकण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा उघडकीस आला. (Pune FDA action)
मावळमधील कंपनीवर धाड, ३१.६७ कोटींचा मुद्देमाल जप्त :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.’ या कंपनीवर २ जानेवारी २०२६ रोजी एफडीएने छापा टाकला. याआधी १ डिसेंबर २०२५ रोजी या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालात या नमुन्यांमध्ये निकोटिन पॉझिटिव्ह आढळून आले.
हे उत्पादन मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून महाराष्ट्र शासनाने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चा माल आणि फ्लेवर्स असा एकूण ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा साठा जप्त करून कंपनीच्या दारांना सील ठोकण्यात आले आहे.
Pune FDA action | संचालकांवर गुन्हे दाखल, हुक्का माफियांचे धाबे दणाणले :
या प्रकरणी अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी (संचालक), फैजल फाजलानी (संचालक) आणि मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३(५), १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम ३०, २६, २७ आणि ५९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
भिवंडी येथील ‘मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी’ या गोदामावर ३० डिसेंबर २०२५ रोजी टाकण्यात आलेल्या छाप्यात १९.४५ कोटी रुपयांचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला होता. याच कारवाईचा धागा पुढे नेत पुण्यातील ही मोठी साखळी उघडकीस आली. या धडक कारवाईमुळे राज्यातील सुगंधित तंबाखू आणि हुक्का माफियांचे धाबे दणाणले आहेत. (Pune FDA action)
या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख करत आहेत. दरम्यान, राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि हुक्का उत्पादनात कोणीही कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.






