Kalpana Bhagwat Case | छत्रपती संभाजीनगरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल सहा महिने वास्तव्यास राहणाऱ्या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्पना भागवत म्हणून स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या या महिलेचे थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तिच्या अटकेनंतर चौकशीदरम्यान अनेक गोपनीय आणि संशयास्पद दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करताना पोलिसांना 11 जणांची यादी सापडली. विशेष म्हणजे या यादीत हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नावही समोर आले. खासदारांच्या नावाचा उल्लेख होताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चासत्रे रंगली असून यामागील तपशील जाणून घेण्यासाठी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खासदारांचा खुलासा – “ती माझ्याकडे रामभद्राचार्य महाराजांची शिष्या म्हणून आली होती” :
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, काही दिवसांपूर्वीच त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या चुलत भावाच्या मुलाची ट्रेनमध्ये त्या महिलेची भेट झाली होती. त्यानंतर ती स्वतःला आयएएस अधिकारी सांगत त्यांच्या गावी आली आणि मंदिरासाठी देणगीची विनंती केली. ती रामभद्राचार्य महाराज यांची शिष्या असल्याचेही सांगत होती, असे खासदारांनी स्पष्ट केले. (Kalpana Bhagwat Case)
त्यांनी सांगितले की, महिलेच्या विनंतीवर विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला 20 हजारांची मदत केली. त्यानंतरही 2-3 वेळा विविध कारणांनी पैशांची मागणी करत ती त्यांच्याशी संपर्कात राहिली. खासदारांनी सांगितले की, कल्पना भागवत कोल्हापूरमध्ये अपघात झाल्याची एका पुरुष व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 10 हजार रुपयांची मदत केली. “29 ऑक्टोबर रोजी मी शेवटचे पैसे दिले,” असे पाटील यांनी सांगितले.
Kalpana Bhagwat Case | पाकिस्तानमधून आर्थिक मदत? चौकशीत उघड होतायत धक्कादायक धागेदोरे :
या प्रकरणाचा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे त्या महिलेच्या मोबाईल आणि कागदपत्रांतून पाकिस्तानमधून आलेल्या पैशांचा तपशील सापडल्याचे सांगितले आहे. मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बनावट ओळख, सरकारी अधिकाऱ्यांची नक्कल, परदेशी आर्थिक व्यवहार अशा अनेक मुद्द्यांमुळे या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेचाही प्रश्न निर्माण केला आहे.
खासदार पाटील यांनी मात्र कोणतीही गैरव्यवहाराची माहिती नसल्याचे सांगितले आहे. “गरज म्हणून मी मदत केली. मला पद्मश्री वा कोणताही सरकारी सन्मान हवा होता असे नाही. माझ्याकडे जेवढे असते ते मी लोकांत वाटतो,” असे त्यांनी म्हटले. मात्र, त्यांच्या नावाचा आर्थिक व्यवहारांमध्ये उल्लेख झाल्याने चौकशीत त्यांची भूमिका काय हे तपासले जाणार आहे.






