EPFO News | केंद्र सरकारने अलीकडेच जीएसटीच्या स्लॅबमध्ये कपात करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता दिवाळीपूर्वी आणखी एक गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय EPFO 3.0 नावाची नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे देशभरातील सुमारे ८ कोटी पीएफ खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे.
EPFO 3.0 म्हणजे काय? :
या नव्या योजनेत भविष्य निर्वाह निधी (PF) खातेधारकांना थेट ATM आणि UPI द्वारे अंशतः पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या PF रक्कम NEFT किंवा RTGS द्वारे ट्रान्सफर केली जाते, ज्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. मात्र EPFO 3.0 सुरू झाल्यानंतर खातेधारकांना तत्काळ रक्कम मिळू शकेल.
सध्या ईपीएफओ अंतर्गत दिली जाणारी किमान पेन्शन 1000 रुपये प्रतिमहिना आहे. कामगार संघटना अनेक वर्षांपासून ती वाढवण्याची मागणी करत आहेत. या बैठकीत पेन्शन 1500 रुपयांवरून 2500 रुपये करण्याचा प्रस्तावही चर्चेत येण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी हा निर्णय झाला तर लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
EPFO News | ऑटो क्लेम सुविधा सुधारली जाणार :
सध्या आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घर खरेदीसारख्या गरजांसाठी कर्मचारी ५ लाख रुपयांपर्यंतचे पैसे ऑटो क्लेम सुविधेद्वारे काढू शकतात. मात्र त्यासाठी किमान ३ दिवसांचा वेळ लागतो. EPFO 3.0 मध्ये ही प्रक्रिया वेगवान होणार आहे आणि लोकांना एटीएममधून तात्काळ पैसे काढता येणार आहेत.
तथापि, कामगार संघटना या प्रस्तावाला आक्षेप घेऊ शकतात. त्यांचे मत आहे की PF ही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठीची बचत असून ती फक्त अत्यावश्यक गरजांमध्येच वापरली जावी. तरीसुद्धा सरकार सर्व बाजू विचारात घेऊन दिवाळीपूर्वी काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (PF Withdrawal News)
बैठकीची तारीख आणि अपेक्षा :
१० आणि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली EPFO केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत EPFO 3.0 आणि किमान पेन्शन वाढ यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोट्यवधी कामगार, कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.






