नाशिक ते अहिल्यानगर प्रवाशांसाठी गुड न्यूज! ई-शिवाई इलेक्ट्रिक बस सुरू; जाणून घ्या वेळापत्रक

On: December 25, 2025 12:02 PM
Nashik - Ahmednagar Electric Bus
---Advertisement---

Nashik – Ahmednagar Electric Bus | नाशिक ते अहिल्यानगर दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या मार्गावर नवीन ई-शिवाई इलेक्ट्रिक बस सुरू केली असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, जलद आणि पर्यावरणपूरक होणार आहे. बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ पासून ही बससेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिक आणि अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. (Nashik – Ahmednagar Electric Bus)

नाशिक विभागाकडून सध्या इलेक्ट्रिक बससेवेला मोठ्या प्रमाणावर विस्तार दिला जात असून आतापर्यंत ६० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून कमी खर्चात, शांत आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळत असल्याने प्रवाशांची पसंती वाढत आहे. आता त्यात नाशिक-अहिल्यानगर या महत्त्वाच्या मार्गाची भर पडली आहे.

नाशिक विभागात वाढतोय इलेक्ट्रिक बसचा विस्तार :

नाशिक विभागातून शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड, कसारा, मालेगाव, शिवाजीनगर, सटाणा, बोरीवली आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांसाठी आधीच इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवरही या बसेस धावत असल्याने प्रवाशांना वेगवान आणि सुखकर प्रवास करता येत आहे. (Nashik – Ahmednagar Electric Bus)

खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीनही जिल्हे सुद्धा इलेक्ट्रिक बससेवेशी जोडले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आगाराच्या ताफ्यात आतापर्यंत ६५ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून पुढील काळात आणखी बसेस जोडण्याचा महामंडळाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक ते अहिल्यानगर या मार्गावर ई-शिवाई बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nashik – Ahmednagar Electric Bus | वेळापत्रक आणि तिकीट दर काय असणार? :

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून अहिल्यानगरसाठी सकाळी सहा, सात, आठ, नऊ, दहा आणि अकरा वाजता इलेक्ट्रिक बस सोडली जाणार आहे. तर अहिल्यानगरहून नाशिककडे दुपारी एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा वाजता बस सेवा उपलब्ध असणार आहे. म्हणजेच या मार्गावर दररोज प्रत्येकी सहा अशा एकूण बारा फेऱ्या होणार आहेत. (Nashik – Ahmednagar Electric Bus

तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर नाशिक ते अहिल्यानगर या इलेक्ट्रिक बससाठी पूर्ण तिकीट दर ४७१ रुपये इतका ठेवण्यात आला आहे. अर्ध्या तिकिटासाठी हा दर २४१ रुपये असेल. विशेष म्हणजे, प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी या बससाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नियोजनबद्ध आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

News Title: Electric Bus Service Launched Between Nashik and Ahmednagar; Check Timetable and Ticket Fare

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now