BMC Elections | आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना, मंगळवारी सकाळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) अचानक राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पाऊण तास चर्चा झाली.
उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (MNS) युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना, एकनाथ शिंदे यांच्याकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याने राज ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा न झाल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभा मतदारसंघात गोंधळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना, युती आणि जागावाटपावरून योग्य चर्चा झाली नसल्याचा आरोपही मनसेने केला होता.
BMC Elections | आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही :
आता पुन्हा महापालिका निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या वेळी जागावाटपावरून कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये, यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही असल्याचे दिसत आहे. मागच्या वेळेप्रमाणे चर्चेला उशीर होऊ नये, यासाठी दोन्ही राजकीय पक्ष खबरदारी घेत आहेत, असे बोलले जात आहे. त्यामुळे, उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळातून गांभीर्याने पाहिले जात आहे.
दरम्यान, ‘शिवसेना शिंदे गटा’चे नेते उदय सामंत यांनी ‘शिवतीर्थ’वरून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, “मी सकाळी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलावले. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी केवळ चांगला चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो. आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती, तर मी तसे सांगितले असते. राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणा पलीकडचे आहेत. त्यामुळे सगळ्याच भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. आता इथून मी मुक्तागिरीवर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मी आता राज ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातोय, असा अर्थ काढू नका,” असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला नाही.






