Eknath Khadse | जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यातील वादाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे (Eknath Khadse) यांनी थेट कबुली देत “होय, मी भाजपला मदत केली,” असे जाहीर वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या विधानामुळे महायुती आणि स्थानिक राजकीय समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुलाबराव पाटील यांनी अलीकडे एका सभेत खडसे (Eknath Khadse) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना “नाथाभाऊंनी अनेकांना त्रास दिला” असा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि “मी भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्रास दिला, ही गोष्ट खरी आहे आणि पुढेही देणार,” असा स्पष्ट इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
गुलाबराव पाटलांना जोरदार प्रत्युत्तर :
एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना थेट लक्ष्य करत “गुलाबराव खूप लहान आहेत” असा टोला लगावला. तसेच, “मी जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केलं. यासोबतच, गुलाबराव पाटील आमदार असताना त्यांच्या प्रचारात आपण मदत केल्याचाही दावा त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील जुने मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील राजकारणात महाजन, खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील संघर्ष आधीपासूनच चर्चेत होता. मात्र आता खडसे यांच्या थेट विधानामुळे हा वाद आणखी तीव्र झाला असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Eknath Khadse | “होय, मी भाजपचा प्रचार केला” – नाथाभाऊंची थेट कबुली :
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान भाजपला मदत केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी कोणतीही लपवाछपवी न करता, “खरं बोलायला काय हरकत आहे? होय, मी भाजपला मदत केली,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. गुलाबराव पाटील इतकी वर्ष मंत्री असूनही त्यांच्या गावच्या नगरपरिषदेत स्वतःचा पक्ष निवडून आणू शकले नाहीत, असा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. वरणगाव नगरपरिषदेतील पराभूत उमेदवार राजेंद्र चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खडसे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणं वेगाने बदलत असल्याचं चित्र दिसून येत आहे.






