Ditwah Cyclone Alert | देशावर मोठं हवामान संकट उभं ठाकलं असून ‘हिटवाह’ अथवा ‘Ditwah Cyclone’ वेगाने भारताच्या दिशेने सरकत आहे. श्रीलंकेत कहर घालून हे चक्रीवादळ आता दक्षिण भारताच्या किनारपट्टीकडे धाव घेत आहे. यामुळे तामिळनाडू, पुडुचेरीसह अनेक राज्यांत पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानेही याबाबत तातडीचे अलर्ट जारी केले असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. (Ditwah Cyclone Alert)
भारतीय हवामान खात्याने (IMD) यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भारताने अतिशय वेगाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले आहे. या अंतर्गत मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली असून किनारपट्टी भागात प्रशासन अलर्ट मोडवर काम करत आहे. श्रीलंकेत या वादळामुळे तब्बल 200 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, त्यामुळे भारताने सावधगिरीचा कडेकोट बंधोबस्त सुरू केला आहे.
दक्षिण व पूर्व किनारपट्टीवर अलर्ट :
आज 1 डिसेंबर 2025 रोजी हे चक्रीवादळ भारताच्या काही भागांना स्पर्श करण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ आणि ताशी 20–25 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे याचा इशारा दिला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरही समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. (Ditwah Cyclone Alert)
या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचे सर्व उपाय तैनात करण्यात आले आहेत. विशेषतः ओडिशा आणि बंगालमध्ये वाऱ्याचा वेग वाढत असून स्थानिक प्रशासन सज्ज मोडमध्ये आहे.
Ditwah Cyclone Alert | महाराष्ट्रासह उत्तर भारतातील तापमानात चढ-उतार :
हिटवाह चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. हवामान विभागाने काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत तापमानात घट तर काही ठिकाणी किरकोळ वाढ बघायला मिळत आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्याने दिवसभरात गारव्याची अनुभूती येत आहे.
दरम्यान, दिल्लीसह उत्तर भारतात किमान तापमान एक अंकीवर पोहोचले आहे. वायव्येकडील वाऱ्यांचा वेग वाढत असल्याने पुढील दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याला धडक देईपर्यंत हवामानातील चढ-उतार सुरूच राहतील. (Hitwah Cyclone India)






