Dhurandhar 2 Controversy | रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ सध्या बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. देशासह परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र चित्रपटाच्या यशाबरोबरच वादही वाढताना दिसत आहेत. विशेषतः एका राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
निवडणुकांपूर्वी कोर्टात पोहोचले प्रकरण :
रणवीर सिंह (Ranveer Singh) अभिनित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच मोठी कमाई केली आहे. भारतात केवळ पाच दिवसांतच चित्रपटाने 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला, तर जागतिक स्तरावर कमाई 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Dhurandhar 2 Controversy)
परंतु या चित्रपटावर टीकेचाही सूर उमटत आहे. काहीजण या चित्रपटात राजकीय संदेश असल्याचा आरोप करत आहेत. विशेषतः तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) याचिका दाखल करण्यात आली असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
Dhurandhar 2 Controversy | चित्रपटाचा निवडणुकांवर परिणाम होण्याची भीती :
मिळालेल्या माहितीनुसार तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे. शीला नावाच्या एका वकिलाने न्यायालयात अपील दाखल करत या चित्रपटात राजकीय संदर्भ असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, चित्रपटातील कथानक मतदारांच्या भावना प्रभावित करू शकते आणि निवडणुकीच्या वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की चित्रपटातील काही प्रसंग आणि संवेदनशील कथा राजकीय दृष्टिकोनातून मतदारांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे निवडणुकीपूर्वी तमिळनाडूमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाने यासंदर्भात औपचारिक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतरच या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. दरम्यान या वादाबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक किंवा निर्माते यांची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.






